लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी शहरातील अनधिकृत गतिरोधकांचा मुद्दा गाजला. या बैठकीमध्ये नगर परिषद, वीज वितरण, बँक, रस्ते वाहतूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विजयकुमार सवडतकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, मंगरूळपीर नगर परिषदेचे पी. डी. गणेशपुरे, महावितरणचे व्ही. आर. जामकर यांच्यासह गजानन साळी, रमेशचंद्र बज, धनंजय जतकर, नामदेव बोरचाटे, रजनी गावंडे आदी अशासकीय सदस्य उपस्थित होते.नगर परिषद क्षेत्रातील रस्त्यांवर तयार करण्यात आलेले अनधिकृत गतिरोधक हटविण्यात यावीत, अशी मागणी यावेळी अशासकीय सदस्यांनी केली. गतिरोधकामुळे वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तसेच ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.त्यामुळे या परिसरात जड वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. महावितरणमार्फत वीज ग्राहकांना अनेकदा चुकीची वीज बिले दिली जात असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे सांगून वीज बिल अचूक व नियमित वेळेत मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दाही अशासकीय सदस्यांनी मांडला. या बैठकीमध्ये चर्चेस आलेले सर्व मुद्दे तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी खंडागळे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत गतिरोधकाचा मुद्दा गाजला!
By admin | Published: May 31, 2017 1:08 AM