वाशिम : जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ ची सर्वसाधारण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ८ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे पार पडली. या बैठकीत वाशिम जिल्ह्याला अतिरिक्त १५ कोटी रुपयांचा निधी मिळण्याला मंजुरी मिळाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा पाठपुरावा फळास आला आहे.
या बैठकीमध्ये आकांक्षित वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे २१२.४० कोटींची मागणी केली होती. त्यामध्ये ८० कोटींची अतिरिक्त मागणी होती. मागील वर्षी १७० कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये वाढ करून १८५ कोटी रुपये देण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण भागाच्या विकासाकरिता अतिरिक्त १५ कोटींची मागणी केली असता त्यास मंजुरात देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ साठी जिल्ह्यातील विविध यंत्रणाची मागणी ३८२.१६ कोटी रुपये होती. शासनाने कमाल मर्यादा १०५.९२ कोटी रुपये ठरवून दिली होती. तसेच आकांक्षित जिल्हा म्हणून २५ टक्के अतिरिक्त निधी म्हणजेच एकूण २६ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीने ८० कोटींची अतिरिक्त मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करता ५२ कोटी ६० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी मंजूर करण्यात आली. त्यापैकी १५ कोटी रुपये जिल्ह्यातील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, तीथक्षेत्र विकास व इतर कामांकरिता मंजुरी दिल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.