श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने २० जानेवारी रोजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या संसर्गजन्य कोरोना महामारीचे भीषण संकट उभे ठाकले असल्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताअभावी इतर रुग्णांना आपले जीव गमवावे लागत असल्यामुळे रक्तदानाद्वारे मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर शासनाकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या तथा महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे रासेयो संचालक डाॅ. राजेश बुरंगे उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुभाष गवई यांच्या अध्यक्ष तथा मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एम. के. राठोड, अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्यामसुंदर निकम, ईन्नानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. आर. राजपूत, कि. न. गो. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विनय कोडापे उपस्थित राहतील.
वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातून पाच रासेयो स्वयंसेवक या रक्तदान शिबिरात रक्तदान करणार असून, असे एकंदरीत शंभर रक्तदाते जिल्हाभरातून रक्तदान करणार आहेत.
जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने रासेयो क्षेत्रीय समन्वय डाॅ. कैलास गायकवाड यांच्या समन्वयात व्यवस्थापन समिती, कार्यक्रम अधिकारी डाॅ. योगेश पोहोकार यांच्या समन्वयात स्वागत समिती, राजेश अढाऊ यांच्या समन्वयात अल्पोपहार समिती, प्रा. पराग गावंडे यांच्या समन्वयात प्रमाणपत्र वितरण समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्यांना कुणाला रक्तदान करावयाचे असेल त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.