खरीप हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करीत आहेत. त्याकरिता विविध कीटकनाशकांसह इतर साहित्य खरेदी करावे लागत असल्याने शेतकरी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड करीत आहेत. अशात घरी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकणे हाही एक पर्याय शेतकऱ्यांसमोर असल्याने शेतकरी शेतमाल विकण्यासाठी बाजार समित्यांत धाव घेत आहेत. आता मात्र विविध सण-उत्सव आणि शासकीय सुट्यांमुळे बाजार समित्या पुढील चार दिवस बंद राहणार असून, मंगळवारीच बहुतांश बाजारातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू राहणार आहेत. शुक्रवारी नागपंचमीनिमित्त सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. शनिवार, रविवारी बहुतांश बाजारातील व्यवहार बंद ठेवले जातात. त्यात १४ ऑगस्टचा शनिवार हा महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने आणि त्यानंतर रविवार येणार असल्याने कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम या बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मंगळवारीच आपला शेतमाल विकता येणार आहे.
जिल्ह्यातील बाजार समित्या चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:46 AM