बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. यावर्षी ९०.८१ टक्के निकाल लागला आहे. अमरावती विभागात अकोला ८९.८१, अमरावती ८९.९५, यवतमाळ ८४.८० व वाशिम ८९.१२ असा निकाल असून, बुलडाणा जिल्हा ‘द्वितीय’ ठरला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे. बारावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील ३१ हजार ९०० विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ३१ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २८ हजार ९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ९०.८१ टक्के एवढा लागला आहे. बुलडाणा, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद व संग्रामपूर या सर्वच तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे अधिक आहे.बदलत्या काळात बारावीच्या निकालापेक्षाही नीट, पीएमटी, पीईटीच्या निकालाची अनेकांना अधिक प्रतीक्षा असल्याने, तसेच निकाल आॅनलाइन असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालयांच्या परिसरात मंगळवारी जल्लोषाचे चित्र दिसून आले नाही. सायबर कॅफेवरही फारशी गर्दी दिसून आली नाही. गुणवत्ता यादी बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील गुणवंत शोधण्याची धडपड करताना अनेक शाळांमधील शिक्षक दिसून आले. अनेक विद्यार्थी हे जिल्ह्यातील असले, तरी विविध क्लासेसच्या निमित्ताने बाहेर जिल्ह्यात शिकत आहेत. तेथेही या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी दाखविली आहे. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात कौतुक होत आहे.तेराही तालुक्यांत मुलीच अव्वलबारावी परीक्षेच्या निकालात गेल्या सहा वर्षांपासून सतत बाजी मारणाऱ्या मुलींनी यावर्षीही चमक दाखविली आहे. तेराही तालुक्यात मुली अव्वल आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ९२७ मुलींनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ९१५ मुलींनी परीक्षा दिली असून, यामधून १३ हजार ९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे, तर १७ हजार ९७३ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, प्रत्यक्षात १७ हजार ९५४ मुले परीक्षेला बसली. यापैकी १५ हजार ९३० म्हणजेच ८८.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींमध्ये जिल्हा अमरावती विभागात अव्वल अमरावती विभागात मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. अमरावती जिल्ह्यात मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३७ टक्के आहे, तर अकोला जिल्ह्याची ९३.१४ टक्के, वाशिम ९२.२७ टक्के, यवतमाळ ८८.५५ टक्के बुलडाणा ९३.४९ टक्के आहे.
विभागात जिल्हा दुसरा!
By admin | Published: May 31, 2017 12:49 AM