- नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सदर मुलाखती ऐन वेळेवर रद्द केल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली व त्यांनी रोष व्यक्त केला.
जिल्हा कार्यक्रम समन्वयक या एका पदासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतिने मुलाखतीस पात्र ठरलेल्या १३ उमेदवारांना १३ एप्रिल रोजी आपल्या सर्व मुळ कागदपत्रासहीत सकाळी ९ वाजता स्व. वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे बोलाविण्यात आले होते. यामध्ये अकोला, नांदेड, कारंजासह ईतर ठिकाणच्या डॉ. रोहन हरिप्रसाद तिवारी, रामेश्वर गणेश गिरी, डॉ. रंजीत पंजाबराव सरनाईक, आनंदा महाजन तुपेकर, वृषाली डिगांबर देशमुख, समाधान दत्ताभाऊ लोणसुणे, डॉ. सोनु हिरामन हडके, महेंद्र श्रीपत मनवर, मोहन प्रभाकर देशमुख, प्रमोद श्रीकांत तुरेराव, सचित भारत गोटे, अमोल काशिनाथराव बांगर, सचिन श्यामराव कुळकर्णी या उमेदवारांचा समावेश होता. यातील बहुतांश उमेदवार आपल्या गावाहून सकाळी ९ वाजता हरज राहण्याच्या दृष्टीने पहाटेच घरुन निघालेत. मुलाखतीसाठी वेळ होवू नये याकरीता मुलाखत स्थळी ताटकळत बसले होते. मुलाखत आता होईल मग होईल या प्रतिक्षेत असतानाच काहीही कारण न सांगता मुलाखती रद्द करण्यात आल्याच्या सुचना देण्यात आल्यात. उमेदवारांनी विचारणा केली असता कोणी काहीच उत्तर न दिल्याने हताश होवून उमेदवार घरी परततले.
जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी आज १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदासाठी उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. अपरिहार्य कारणामुळे पूर्ण समिती सदस्य उपस्थित राहु न शकल्याने सदर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्यात. पुढे घेण्यात येत असलेल्या मुलाखतीची तारीख व वेळ उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.
- सुधाकर जिरवणकर , प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम