लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या राऊंडमध्ये २४ मार्चपर्यंत ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर पहिल्या लॉटरी राऊंडमध्ये अर्जांतील चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्दही झाले आहेत.
शासनाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ शाळांतील ११७३ जागांसाठी ११६३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाइन अर्ज केले होते. या अर्जांतून विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिली लॉटरी प्रक्रिया वाशिम येथील समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये १४ मार्च रोजी पार पडली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना शिक्षण विभागाच्यावतीने मोबाईलवर मेसेज पाठवून २४ मार्चपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून पाल्यांच्या प्रवेशासाठी धडपड सुरू केली. शासनाच्या संकेतस्थळावर २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ११२ विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पहिल्या लॉटरी प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांची निवड होऊनही आॅनलइन अर्जावर टाकेला पत्ता आणि आधारकार्डवर असलेला पत्ता न जुळणे, कागदपत्रांची पुर्तता नसणे, कागदपत्रांत त्रुटी असणे अशा विविध कारणांमुळे त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागल्याचा प्रकारही घडला आहे.