राजुरा येथील युवा शेतकरी शिवदास गोरे या युवा शेतक-याने पारंपरिक शेतीत वडील कुंडलीक गोरे यांची होत असलेली परवड बघता बारावीनंतर शिक्षणाला विराम देत शेतीची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. सोयाबीन, तूर कपाशीसारख्या पारंपरिक पीक पध्दतीतून अनेकदा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने कर्जबाजारीपणात संसाराचा गाडा हाकणा-या पित्याचे अनुभव बघता त्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरण्याची खूणगाठ मनाशी बांधली. त्यासाठी प्रारंभी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संत्रा व पेरूची लागवड केली. या फळबागेत आंतरपीक सोयाबीन व हरभ-यासारखी पिकेही घेतली; परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शिवदासने मागील वर्षी एकरभर क्षेत्रात अद्रकची लागवड केली. यात खर्च वजा करता त्याला ३ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्याने यंदा अद्रकसह लसूण पिकाची प्रत्येकी एक एकर क्षेत्रात जून महिन्यात लागवड केली. ठिंबक सिंचणच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यवस्थापनामुळे शिवदासच्या शेतातील संत्रा, पेरूच्या फळबागेसह अद्रक व लसूण पीक चांगलेच बहरले. आता ही पिके काढणीच्या टप्प्यात आली आहेत. शिवदासच्या या आधुनिक पीक पध्दतीचा उपक्रम बघण्यासाठी परिसरासह दूरवरचे शेतकरी भेट त्याच्या शेताला भेट देत आहेत. तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुकर, कृषी सहायक एस.एस. ढोबळे यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
===Photopath===
090121\09wsm_3_09012021_35.jpg
===Caption===
अद्रक, लसुणाची लागवड