शेलुबाजार (वाशिम) : गर्दी टाळण्यासाठी प्रमुख शहरांसह गावातील आठवडी बाजार अन्यत्र हलविले जात आहेत. शेलुबाजार येथील मुख्य चौकातील बाजार आठवडी बाजारातील बैलबाजाराच्या आवारात २९ मार्च रोजी हलविण्यात आल्याने गर्दी टळली आहे.जिल्हा, तालुका व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. गर्दी कमी करण्याचे आवाहन प्रत्येकाला केले जात असून, शेलुबाजार येथील मुख्य चौकातील गर्दी हटविण्यासाठी येथील येथील भाजी विक्री दुकाने महसुल विभाग व ग्राम पंचायतच्या पुढाकाराने येथील आठवडी बाजारातील बैलबाजाराच्या आवारात हलविण्यात आली. भाजीपाला व फळाची दुकाने २० बाय २० जागेत थाटून ४ फुट अंतरावर ग्राहक उभा राहील अशी व्यवस्था करण्यात आली. भाजी विक्री दुकानांमुळे संचारबंदी असूनही शेलुबाजार चौकात गर्दी होत होती. या गर्दीवर पर्याय म्हणून सदर दुकाने आता बैलबाजाराच्या आवारात सुरक्षित अंतरावर थाटली आहे. त्यामुळे गर्दीला आळा बसला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन नागरिकांनी केल्यास कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी कोणत्याच अफवेवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेच्या वस्तू, भाजीपाल्याची खरेदी झाल्यानंतर तातडीने घरी परत जावे, भाजीबाजारात एकट्यानेच यावे, गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने केले.
शेलुबाजार येथील भाजीबाजाराची विभागणी; गर्दी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 3:04 PM