वाशिम : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. विविध विभागांकडे जिल्ह्यातील नागरिकांचे पोर्टलवरील प्रलंबित असलेले तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी येत्या २ ऑक्टोबरपूर्वी यंत्रणांनी निकाली काढाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी मन्नू पी. एम., अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, नितीन चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चंद्रकांत यादव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी. राऊत, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधिक्षक वानखेडे, नगर परिषदेचे अधिक्षक व्ही.एल. पाटील आदींची उपस्थिती होती.
डॉ. पांढरपट्टे म्हणाले, विविध विभागाकडे विविध योजनांचे तसेच शासकीय कामानिमित्त लाभार्थ्यांचे व नागरिकांचे अर्ज व तक्रारी येत असतात. या पंधरवडादरम्यान १० सप्टेंबरपर्यंत यंत्रणांकडे प्राप्त झालेले अर्ज व तक्रारी येत्या २ ऑक्टोबरपर्यंत निकाली काढाव्यात असे उपस्थित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच विविध यंत्रणांकडे प्रलंबित असलेले अर्ज व तक्रारींची माहिती घेतली. यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी जनावरांवरील लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने गुरांच्या लसीकरणाची माहिती, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, आगामी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक व मतदार ओळखपत्र आधार लिंकींग बाबतच्या माहितीचा देखील आढावा घेतला.
शैलेश हिंगे यांनी विविध विभागाकडे प्रलंबित अर्जाची व तक्रारींची माहिती यावेळी दिली. विविध विभागाकडे २ लाख ६ हजार ३१८ अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार ४९ अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. ३६ हजार ३६९ अर्ज व तक्रारी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.