लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील बाजारपेठांसह ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठातही दिवाळीची धामधुम सुरू असल्याचे दिसत आहे. सजावटीच्या साहित्यांसह, मूर्त्या, दिवे आदिंची दुकाने थाटण्यात आली असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनात घट आली असली तरी, शेतमजुरांना यावर्षी रोजगार उपलब्ध झाला असून, इतरही व्यवसायांची स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी थोडी चांगलीच ठरणार असल्याचे दिसत आहे. येत्या पाच दिवसांत दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असल्याने व्यावसायिकांनी दिवाळीनिमित्त विविध साहित्य, सजावटीच्या वस्तूंची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतही दिवाळीच्या बाजारपेठा सजल्या आहेत. जिल्ह्यातील धनज, कामरगाव, इंझोरी, उंबर्डा बाजार, शेंदुरजना आढाव, शिरपूर जैन, शेलुबाजार अनसिंग या ग्रामीण भागातील मोठ्या बाजारपेठा दिवाळीच्या सणासाठी सज्ज असून, सद्यस्थितीत खरेदीला जोर आला नसला तरी, काही ठिकाणी साहित्य खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण बाजारपेठांतही दिवाळीची धामधुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 5:04 PM