२३ मे रोजी तहसीलदारांनी गावात भेट देऊन दक्षता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी सरपंच राज चाैधरी, पोलीसपाटील उमेश देशमुख, पटवारी मुंडाळे, मनभाचे सरपंच वहीदबेग मिर्झा यांच्यासह कोरोना दक्षता समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
तहसीलदार मांजरे म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून, दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी सर्वतोपरी खबरदारी बाळगावी. कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये. आवश्यक कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर तोंडाला सातत्याने मास्क वापरावा. सोशल व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच एकमेकांशी संवाद साधावा. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता समितीच्या सदस्यांनी सक्रिय कार्य करणे अपेक्षित आहे, असे आवाहन यावेळी तहसीलदारांनी केले.