वाशिम - वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जानकर यांच्याकडे केली आहे.
विदर्भातील वाशिम जिल्हा हा मागासग्रस्त जिल्हा असुन मागील तीन वर्षापासुन जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यावर्षी सुध्दा अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुग्ध विकास मंत्रालयाने ५००० लिटर दुधाची मर्यादा घालुन दिली आहे. परंतु मागासलेल्या व दुष्काळ सदृश्य वाशिम जिल्ह्याच्या दुध संकलन केंद्रावर केवळ १२०० लिटरची मर्यादा ठरवुन देणे ही बाब शेतकºयांवर अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हजारो लिटर दुधाची आवक असतांना ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या १४ दुग्ध उत्पादक संस्थाना केवळ १० लिटर ते २०० लिटर दुध घेण्याची मर्यादा ठरवुन देणे ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे शेतकºयांना हजारो लिटर दुध खाजगी दुध संकलन केंद्रावर अत्यल्प दरात विक्री करावे लागत आहे.त्यामुळे दुध उत्पादक पशुपालक व शेतकºयासोबतच दुध उत्पादक संघ सुध्दा अडचणीत येत आहेत. यावर्षी दुष्काळी परिस्थिती पाहता वाशिम जिल्ह्याला दुध घेण्यावर लावण्यात आलेली मर्यादा उठवुन वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्राला किमान ५००० लिटर दुध घेण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यवतमाळ - वाशिम लोकसभेच्या खा.भावनाताई गवळ यांनी दुग्ध विकास मंत्री मा.ना. महादेवराव जानकर यांच्याकडे केली आहे.