जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि रबी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या काही वर्षांत शेतीकामांमध्ये हार्वेस्टर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यासारख्या यंत्राच्या साहाय्याने कामे केली जात आहेत; मात्र दगडधोंड्यांच्या कोरडवाहू शेतीत हार्वेस्टर किंवा रोटाव्हेटर पोहोचू शकत नाही किंवा तूर कापणीची कामे यंत्राच्या माध्यमातून केली जात नाहीत. अशावेळी मजुरांची नितांत गरज भासते; ४०० ते ५०० रुपये मोजूनही मजूर शेतीच्या कामावर यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.
.......................
काय म्हणतात शेतकरी
१) पाच वर्षांपूर्वी शेतीकामावरील मजुरीचे दर १०० ते १५० रुपये होते, ते आज ४०० ते ५०० वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच तूर कापणीचे दर १२०० रुपये प्रति तिफन होते. यंदा मात्र ते ३ ते ४ हजारांवर गेले आहेत. इतके पैसे देण्यास तयार असूनही मजूर मात्र कामावर यायला तयार नसतात, असे खानापूर (ता. कारंजा) येथील शेतकरी राजेश पाटील कडू यांनी सांगितले.
............
२) भडशिवणीत अधिकांश शेती कोरडवाहू असून दगडधोंड्याच्या शेतात यंत्राच्या साहाय्याने कामे होत नाहीत. त्यामुळे मजुरांचीच मनधरणी करावी लागते; मात्र फारशी गरज उरली नसल्याने बक्कळ मजुरी देऊनही मजूर कामावर यायला तयार नसल्याचे भडशिवणी येथील शेतकरी राजे मनोहरराव लाहे यांनी सांगितले.
...........
३) गोरगरीब कुटुंबांना २ रुपये किलोने धान्य मिळत आहे. तांदूळही अत्यल्प दराने मिळतो. यासह शासनाच्या विविध स्वरूपातील योजना त्यांच्यासाठी लागू आहेत. त्यामुळेच शेतमजुरीची कामे करायला मजूरांमध्ये फारसा उत्साह राहिलेला नाही. कामे घेतल्यानंतर मधातच ती थांबविणारे अनेक मजूर आहेत. यामुळे मालाचे नुकसान होऊन मनस्ताप सहन करावा लागतो, असे शेतकरी रवि मारशेटवार यांनी सांगितले.
.................
मजुरीचा दर
पाच वर्षांपूर्वीचा दर
पुरुष मजूर - १५०
महिला मजूर - १००
.........
यंदाचा मजुरी दर
पुरुष मजूर - ५००
महिला मजूर - ३५०
............
यंत्राने होणारी कामे
नांगरणी, वखरणी, डवरणी यासह गहू कापणीची कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात; मात्र आजही शेतातील इतर अनेक कामे मजूरांच्याच माध्यमातून करावी लागतात.
..............
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय धोकादायक ठरू लागला आहे. बक्कळ पैसे मोजूनही मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे नुकसान होत आहे. ते टाळण्याकरिता बहुतांश शेतकऱ्यांनी शेत मशागतीच्या कामांसाठी यंत्राचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटर ही त्यातील काही यंत्र होत.