वाशिम : वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरात अवैध गर्भपात करण्यापूर्वी एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकाने व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये डॉ. एस. एम. सारसकर व विलास ठाकरे नामक बोगस डॉक्टरला अटक केली आहे.
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस. एम. सारसकर नामक दवाखान्यामध्ये अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नबंरवर मिळाली होती. या माहितीच्या आधारावर १८ आॅगस्ट रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या चमूने सायंकाळी ६ वाजता दरम्यान शहर पोलीसांच्या मदतीने छापा मारला. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील एक ४० वर्षीय महिला गर्भपाताकरिता १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून भरती असल्याचे व तिच्यावर गर्भपाताकरिता उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. साहित्य जप्त करून आरोपी डॉ. सारसकर व विलास ठाकरे नामक बोगस डॉक्टरलाही अटक करून वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांविरूध्द वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेची प्रकृती धोक्याबाहेरगर्भपाताचे उपचार करण्यात आलेल्या महिलेला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सुरक्षित गर्भपातानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. तिच्याकडे हिंगोली येथील एका सेंटरमधील सोनोग्राफी रिपोर्ट आढळून आला.