वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक केले आहे. हा अहवाल असेल तरच संबंधित प्रवाशाला त्यांच्या राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना आधी कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे.
दुसऱ्या लाटेत रेल्वे प्रवासही प्रभावित झाला होता. दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यानुसार आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा सरकारने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक केले आहे. इतकेच नव्हे, तर कर्नाटक राज्याने कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही सोबत आणणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार वाशिमसह राज्यातील प्रवाशांना दुसऱ्या राज्यात रेल्वेने जाण्यासाठी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने रेल्वे प्रवासाला आता पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
००००००
सध्या सुरू असलेल्या रेल्वे ...
तिरुपती-अमरावती
नरखेड-काचीगुडा
जम्मुतावी-नांदेड
हैदराबाद-जयपूर
सिकंदराबाद-जयपूर
०००००
या रेल्वे कधी सुरू होणार :
दिल्ली एक्स्प्रेस
कोल्हापूर एक्स्प्रेस
मुंबई एक्स्प्रेस
०००००
पॅसेंजर कधी सुरू होणार :
- अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळली आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या पॅसेंजर अद्यापही सुरू न केल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. पॅसेंजर कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
- रेल्वे बोर्डाकडून पॅसेंजर सुरू करण्याचे जेव्हा आदेश येतील, तेव्हाच पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
०००००
कोरोना टेस्ट आणि लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
देशभरात आतापर्यंत कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आढळून आल्यामुळे, इतर राज्यांनी महाराष्ट्रातून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचणी करून, तिचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले आहे.
००००
नरखेड-काचीगुडा इंटरसिटीला सर्वाधिक पसंती
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने गेल्या महिन्यापासून सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे व्यापार व उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यामुळे नागरिकांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. नरखेड-काचीगुडा या इंटरसिटी एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंती मिळत आहे. याशिवाय जम्मुतावी-नांदेड, सिकंदराबाद-जयपूर या रेल्वेलाही प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. प्रवाशांची गर्दी होत असली तरी या रेल्वेमध्ये आरक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत नाही.
००००
कोट बॉक्स
खबरदारी म्हणून इतर काही राज्यांतील सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे आवश्यक केले आहे. त्यानुसार प्रवाशांनी या नियमांचे पालन केले तरच त्यांना संबंधित राज्यात प्रवेश मिळणार आहे.
- एम.टी. उजवे
स्टेशन मास्तर, वाशिम