राजुरा (जि. वाशिम) : पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना जबर चावा घेत दुखापत केल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजतादरम्यान राजुरा येथे घडली. मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सर्व रुग्णांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात संदर्भीत केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोकराव शेंडे यांनी दिली. राजुरा येथील पांडुरंग बळीराम मुसळे हे सकाळी ८ वाजतादरम्यान घरासमोरील वसरीत निवांतपणे बसलेले असताना अचानकपणे लाल रंगाच्या कुत्र्याने धावत येत त्यांच्या पाठीला चावा घेतला. त्यांनी आरडाओरड करताच कुत्र्याने त्यांना सोडून देत घरासमोर राहत असलेल्या कमला नारायण हजारे या महिलेस चावा घेतला. या महिलेनेसुद्धा मदतीसाठी आरडाओरड करताच काही युवक जमा होण्यापूर्वीच कुत्र्याने जुनी झोपडी परिसरातून गावात धूम ठोकत गावातील बबन पांडुरंग कानडे, ज्ञानेश्वर भगवान मोहळे, शे. अनिस शे. मेहबुब व कोमल संजय नाईक अशा एकूण आठ जणांना जबर चावा घेत गंभीर दुखापत केली. पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याची वार्ता गावात सर्वत्र पसरताच अनेक युवकांनी हातात काठया घेऊन कुत्र्याचा शोध घेत त्याला ठार केले. सर्व जखमींना उपचारासाठी मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोकराव शेंडे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय चमूने रुग्णांवर प्राथमिक उपचारासह लस देत उपचार केले व पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात संदर्भीत केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जायभाये, आरोग्य सेविका पाठक, वाहनचालक सहदेव तायडे यांनी उपचारासाठी मदत केली.
कुत्र्याचा चावा; आठ जखमी
By admin | Published: August 31, 2015 1:17 AM