जिल्ह्यात दररोज दाेन हजारांवर नागरिकांचे लसीकरण केले जात असून आतापर्यंत १४ हजार ४७८ जणांनी लस घेतली आहे. दरम्यान, लस घेण्यापूर्वीच इच्छुकांनी रक्तदान करावे. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लस घ्यावी लागते. यादरम्यान रक्तदान करू नये. तसेच २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेतल्यानंतरही पुढील २८ दिवस रक्तदान करता येत नाही, असे शासनाने ब्लड बँकांना पाठविलेल्या पत्राव्दारे जाहीर केले आहे. यामुळे मात्र रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
...............
अशी आहे आकडेवारी
२०००
जणांना दररोज दिली जाते लस
१४,४७८
आतापर्यंत झालेले लसीकरण
०२
जिल्ह्यातील एकूण ब्लड बँका
................
दुस-या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
१) कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर रक्तदान करता येत नाही, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ब्लड बँकांकडून जनजागृती करण्यात येत आहे.
२) प्रथम लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यापुढील २८ दिवसही रक्तदान करू नये, असे आवाहन शासनस्तरावरून करण्यात आले आहे.
..................
कोट :
सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. या घटकात काही जण नियमित रक्तदान करतात; तर ६० वर्षांवरील व्यक्तीकडून रक्तदान करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करू नये, असे पत्र शासनाकडून ब्लड बँकांना पाठविण्यात आले आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
...............
जिल्ह्यातील अनेकांकडून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले जाते. त्यामुळेच रक्ताची उणीव भासत नाही आणि अपघातातील जखमी, प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्राव होणा-या महिलांसह गंभीर आजारातील रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होते. कोरोना लसीकरणानंतर रक्तदान करता येणे अशक्य असल्याने काही प्रमाणात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
- डॉ. नारायण डाळ
ब्लड बँक संचालक, वाशिम
.................
कोरोना लसीकरणाआधी मी केले रक्तदान; तुम्हीही करा!
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दरम्यान, सुरक्षित राहण्यासाठी मी कोरोना लस घेतलेली आहे. त्याच्या काही दिवसांपूर्वी मी रक्तदानही केले; पण आता काही दिवस रक्तदान करता येणार नाही. लस घेतलेली नसल्यास इच्छुकांनी जरूर रक्तदान करावे, असे मत वाशिम येथील धनंजय रणखांब यांनी व्यक्त केले.