वाशिम : गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असून, आॅनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. यामध्ये मात्र बाराखडी व उजळणीचे शिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांना बाराखडी आणि उजळणीचा विसर पडत आहे.
गतवर्षी कोरोनामुळे मार्चपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. गतवर्षी जून महिन्यात विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने आॅनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे. आॅनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल हातात पडतात. शाळा बंद असल्याने जास्तीत जास्त वेळ टीव्हीवर वेगवेगळा कार्यक्रम पाहण्यात घालवतात. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेली शिक्षण प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना उजळणी मुखपाठ असतो. परंतु गत एका वर्षापासून शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. चौथी पाचवीच्या मुलांना भागाकार आणि गुणाकार कसा करायचा, या विसर पडत आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तके वाटप झाली. परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत हे सुद्धा माहिती नाही. आॅनलाइन शिक्षण केवळ २० ते ३० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे करीत असावेत. परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुलेच पालकांना देऊ लागले आहेत. यावर्षी सरसकट मुले उत्तीर्ण झाल्याने पुढच्या वर्गात गेली. पण वर्षभर शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजीची भेट झाली नाही. तसेच बाराखडी अक्षरे गिरविले नाही तरी ही मुले आरटीई कायद्यातील नियमाप्रमाणे दुसरीत प्रविष्ट झाली. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, गूगल मीठ यासारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नसल्याने उजळणीचा विसर पडत असल्याचे दिसून येते. पुुढील काळात शिक्षकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
नव्या शैक्षणिक सत्रात कसरत
मागील वषार्पासून शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले आहे. साहजीकच त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत मोठा फरक जाणवत आहे. परिणामी भविष्यात या विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.