वाशिम : वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे न लपवता तातडीने चाचणी करावी, असे आवाहन वाशिमचे तहसीलदार विजय साळवे यांनी २१ एप्रिल रोजी केले. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विभागाचा आढावा घेतला.
कोरोना संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यांसारखी कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास ती लक्षणे न लपवता तातडीने कोरोना चाचणी करून घेणे आरोग्याच्या दृष्टिने हितकारक आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर, जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, आरोग्य यंत्रणेच्यावतीने योग्य त्या सुविधा व उपचार पुरविले जात आहेत. नागरिकांनीदेखील सतर्क राहून विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला यांसारखी कोरोनाविषयक लक्षणे आढळून येताच कोरोना चाचणी करून घ्यावी, कोणताही आजार लपवू नये, असे आवाहन साळवे यांनी केले.