आरोग्य जपण्याचा सल्ला : दूषित पाण्याने उद्भवतात पोटाचे विकार
संतोष वानखडे
वाशिम : पावसाळ्यात दूषित पाणी, न शिजलेले अन्न व रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आदींमुळे पोटाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हॉटेल उघडले तरी जिभेचे लाड नको, सकस व शक्यतो घरचेच ताजे अन्नपदार्थ सेवन करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक आजार उद्भवतात. पावसाळा सक्रिय झाला आहे. सर्वत्र दमट हवा असते. यामुळे पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ पावसाळ्यात पचत नाहीत आणि त्यामुळे अतिसार, पोटदुखी असे आजार उद्भवू शकतात. अनेक दिवसांनंतर आता हॉटेल्सही उघडू लागली आहेत. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात बाहेरचे खाणे टाळायला हवे. पावसाळ्यात पचनास हलका असा आहार घेणे अपेक्षित आहे.
००००००००००००००
पावसाळ्यात हे खायला हवे...
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. तेव्हा सकस, शुद्ध, पोषक, घरचे अन्नच खावे.
विविध प्रकारच्या भाज्या, फळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत करतात. त्यामुळे त्याचे आहारातील प्रमाण वाढवावे.
मसाल्याचे पदार्थदेखील जसे की मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर, लिंबू आदी पचनसंस्था नीट काम करण्यासाठी मदत करतात.
०००००००
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे
पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
दूषित पाण्याची समस्या असल्याने पाणीपुरी, दहीपुरी आदी चटकदार पदार्थ खाणे टाळावे.
कृत्रिम रंगाने बनविलेले पदार्थ, चायनीज पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
कार्बनेटेड पेयांमुळे शरीरातील मिनिरल्स कमी होतात तसेच शरीराची एन्झाईम्स तयार करण्याची क्षमता मंदावते. यामुळे अपचन होऊ शकते.
००००००००००००००
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्यात आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बॅक्टेरिया, विषाणूचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. पदार्थ बनविण्यासाठी अनेकदा शुद्ध पाणी नसते, गाळलेले किंवा उकळलेले पाणी नसते, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर माशा बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवत असल्याने रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
०००००००००००००००००
कोट
पावसाळ्यात रस्त्यावरचे तसेच चटकदार पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे शक्यतो हलके पदार्थ सेवन करावे. न शिजलेले अन्न तसेच दूषित पाणी अवश्य टाळावे.
- डॉ. नीलेश बढे
पोटविकारतज्ज्ञ, वाशिम
०००
कोट
पावसाळ्यात तेलकट, आंबट, तिखट तसेच उघड्यावरील पदार्थ खाणे, पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. विविध प्रकारच्या डाळी, फळांचे प्रमाण वाढवावे. पचनास हलके अन्न घ्यावे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी.
- डॉ. सुनीता लाहोरे
आहारतज्ज्ञ
जिल्हा सामान्य रुग्णालय