वाशिम : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जात असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पहिल्या डोसनंतर २८ दिवसांत दुसरा डोस मिळाला नाही तर पुढे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका, ४५ दिवसांपर्यंत केव्हाही दुसरा डोस घेता येतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यांत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थींचा प्रतिसादही मिळत आहे. परंतु, गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. जिल्ह्यात १३० केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात असल्याने लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे यापूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना २८ दिवसांत दुसरा डोस मिळाला नाही तर पुढे काय, असा प्रश्न पडत आहे. दुसरा डोस २८ दिवसांतच मिळावा हे आवश्यक नसून, ४५ दिवसांत केव्हाही दुसरा डोस घेता येतो, दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००००००००
दुसऱ्या डोससाठी तीन-चार दिवस थांबा
जिल्ह्यात मागणीनुसार लसीचे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्वांनाच वेळेवर लस उपलब्ध करून देणे तारेवरची कसरत ठरत आहे. उपलब्ध डोसनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तीन-चार दिवसांत लसीचा साठा प्राप्त होणार असून, त्यामधून दुसरा डोस संबंधित नागरिकांना देण्यात येणार आहे.
०००००
डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांतच दुसरा डोस घ्यावा, असे काही नाही. ४५ दिवसांत केव्हाही किंवा दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
०००
एक नजर लसीकरणावर
फ्रंटलाइन वर्कर
पहिला डोस -10723
दुसरा डोस-4096
६० पेक्षा जास्त वयाचे
पहिला डोस -64951
दुसरा डोस-10698
४५ ते ६० वयातले
पहिला डोस -58206
दुसरा डोस-3933