इंझाेरी : कारंजा-मानोरा मार्गादरम्यान इंझोरी येथे दुभाजकाची निर्मिती करण्यात येत असेल, तरच या महामार्गाचे काम करावे, असा पवित्रा इंझोरीवासीयांनी घेतला आहे. इंझोरी ग्रामपंचायतनेही याबाबत ठराव घेतला असून, दुभाजकाची निर्मिती होत असेल तरच रस्त्याचे काम होऊ देणार असल्याचे पत्र कंत्राटदार कंपनीला दिले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कारंजा-मानोरा महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. या मार्गादरम्यान इंझोरी हे मोठ्या लोकसंख्येचे आणि मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. शिवाय याच. तोरणाळा, म्हसणी या गावांना कारंजा-मानोरा मार्गाशी जोडणारा मार्ग इंझोरीतूनच जातो. साहजिकच इंझाेरी येथील मुख्य चौकात सतत वाहतूक सुरू असते. त्यात मार्गालगतच शाळा असल्याने येथे शेकडो विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. आता कारंजा-मानोरा महामार्गाचे काम झाल्यानंतर या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावणार आहेत.
यामुळे इंझोरी येथील मुख्य चौकात अपघात घडण्याची सतत भीती राहणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी मुख्य चौकात दुभाजक निर्मितीची मागणी गावकरी व ग्रामपंचायतकडून केली जात आहे. यासाठी ग्रामपंचायतकडून ठरावही घेण्यात आला असून, दुभाजक निर्मिती कराल, तरच मार्गाचे काम करावे, अशा आशयाचे पत्र कंत्राटदार कंपनीला दिले आहे.
------
तरीही कंपनीकडून काम सुरू
कंपनी व रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष इंझोरी येथील मुख्य चौकात असलेली वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता दुभाजक ठेवण्याची मागणी इंझोरी ग्रामपंचायतने यापूर्वीही केली होती आणि त्यासाठीच इंझोरी येथील काम बंदही ठेवण्यात आले होते; परंतु आता इंझोरी मुख्य चौकात दुभाजकाशिवायच अगदी अरुंद मार्गाचे काम सुरू केले आहे.
-----
इंझोरी बस थांब्यावर ईतर दहा गावातील प्रवासी या ठिकाणाहून ये-जा करत असल्याने मोठी वर्दळ असते. त्यासाठी कारंजा, मानोरा रस्त्यावर दुभाजक असणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदाराने त्याची उभारणी करावी, अन्यथा सर्व गावकरी हे काम बंद पाळतील
हिम्मत राऊत पाटील, सरपंच, इंझोरी