वाशिम : मागील १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि त्यातच वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये हैदोस घातल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीतून स्वत:ला सावरत यंदा शेतकºयांनी मोठ्या आशेने खरीप हंगामात पेरणी आटोपली. मृग नक्षत्रात बºयापैकी पाऊस झाल्याने आणि त्यानंतरही अधूनमधून पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिके चांगलीच बहरली. परंतू, गत १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. त्यातच हरीण, वानरं, रोही आदी वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घालून पिकांची नासाडी चालविल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. रिसोड तालुक्यातील चिखली, कवठा, किनखेडा, व्याड, वनोजा, घोटा, मालेगाव तालुक्यातील डही, वारंगी, कळंबेश्वर, मेडशी तसेच वाशिम तालुक्यातील पार्डीटकमोर, अडोळी, कार्ली शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. परंतू सकाळी किंवा सायंकाळनंतर शेतात थांबणे शक्य होत नसल्याने या वेळेत वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा !एकिकडे पावसाने दडी मारल्याने पिके सुकून जात आहेत तर दुसरीकडे वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी डही येथील प्रगतशील शेतकरी उमेश अवचार, दीपक अवचार, पवन अवचार आदींनी केली.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; पावसाची दडी; त्यातच वन्यप्राण्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 3:20 PM