लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून बचावात्मक पवित्रा म्हणून डॉक्टरांच्या आवाहनानुसार डबल मास्कचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे विक्रीतही वाढ झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान हात वारंवार धुण्याच्या सवयीमुळे सॅनिटायझरचीही मागणी वाढली आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे आदी उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा, असाही सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना डबल मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढल्याने आपसूकच विक्रीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कोेरोना चाचण्यांची दैनंदिन संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन सरासरी ४५० रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक जण मास्कचा वापर करण्याला प्राधान्य देत असल्याने मास्कच्या मागणीत वाढ झाल्याचे औषधी विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधीचीदेखील मागणी वाढली आहे.
सॅनिटायझरची मागणी वाढलीकोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आणि सौम्य व मध्यम लक्षणे असणारे रुग्ण हे अधिक संख्येने गृहविलगीकरणात राहत असल्याने सॅनिटायझरचा वापर वाढल्याचे दिसून येते. गृहविलगीकरणातील रुग्णामुळे घरातील इतर सदस्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझरचा वारंवार मारा केला जात आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वीच्या तुलनेत आता सॅनिटायझरची मागणी वाढली आहे.
अलीकडच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक जण डबल मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येते. याबरोबरच रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधीलादेखील मागणी आहे.- हुकूम पाटील तुर्के , संचालक, मेडिकल स्टोअर्स, वाशिम