वाशिम : दक्षिण पश्चिम रेल्वे, बेंगळुरु विभागातील बसमपल्ली स्टेशन आणि श्री सत्यसाई प्रशांती निलयमदरम्यान तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी प्रस्तावित ब्लॉकमुळे जवळपास दोन महिने डॉ.आंबेडकरनगर-यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अकोला-पूर्णा रेल्वेमार्गावरुन धावणारी डॉ.आंबेडकरनगर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या १० डिसेंबर ते ६ फेब्रुवारी या कालावधीत अप-डाऊनच्या प्रत्येकी ९ फेऱ्या रद्द होणार आहेत. दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी सोयीची असलेले ही गाडी येत्या काळात धावणार नसल्याने वाशिमकर प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकरनगर येथून दर रविवारी सुटणाऱ्या १९३०१ डॉ.आंबेडकरनगर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या १० डिसेंबर ते ४ फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत ९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील यशवंतपूर येथून दर मंगळवारी सुटणाऱ्या गाडी क्रमांक १९३०२ यशवंतपूर-एक्स्प्रेसच्या १२ डिसेंबर ते ६ फेब्रुवारीपर्यंत ९ फेऱ्या रद्द असणार आहेत. वाशिम मार्गे इंदूर, बेंगळुरू या मोठ्या शहरांसाठी असलेली ही एकमेव रेल्वे दोन महिन्यांपर्यंत रद्द झत्तल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.