वाशिम : एप्रिल महिन्याला सुरूवात होत नाही; तोच पाणीप्रश्न गंभीर बनला असून पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ विविध माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येते.
२०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे जलप्रकल्पातही पुरेशा प्रमाणात पाणी नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यातील ५१० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. मात्र, विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता उर्वरीत उपाययोजनांची अंमलबजावणी संथगतीने असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पाणी उपलब्ध नसल्याने काही गावातील नागरिक रास्ता रोको, मोर्चा काढून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी लावून धरत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पातील पाणी इतरत्र वळविण्याचे प्रस्तावित असल्याने जवळपास २० गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. या गावातील नागरिकांनी १ एप्रिल रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ बंद ठेवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी केली. मानोरा तालुक्यातील म्हसणी येथून होत असलेल्या प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे पाणी चोंढी गावाला देण्याच्या मागणीसाठी चोंढी गावाच्या नागरिकांनी कारंजा - मानोरा रस्त्यावर ३ एप्रिल रोजी महिलांसह रास्ता रोको केला. मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे पाणीप्रश्न पेटला असून, पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगरूळपीर तहसील कार्यालयावर २ एप्रिल रोजी मोर्चा काढून रोष व्यक्त केला होता. मानोरा तालुक्यातील भोयणी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ३ एप्रिल कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको केला. मंगरूळपीर शहरात गत २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.