वाशिम : कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्याने बहुतांश उद्योग, दुकाने बंद आहेत तर कामगारांनाही काम मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, उत्पन्न घटले असून, दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे व नियमित सर्व्हिसिंग नसल्याने वाहनाचा खर्च मात्र वाढत आहे. कडक निर्बंधामुळे सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्याने वाहनांचे आरोग्यही बिघडत असल्याचे दिसून येते. परंतु, पर्याय नसल्याने आहे त्याच परिस्थितीत वाहन चालविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जीवनावश्यक गरजांमध्ये अलीकडच्या काळात वाहनांचाही समावेश झाला असून, धावपळीच्या या युगात नागरिकांना वाहनांचा मोठा आधार मिळत आहे. वाहनांमध्ये काही बिघाड होऊ नये, यासाठी नियमित सर्व्हिसिंग होणे आवश्यक आहे. मात्र, कडक निर्बंधामुळे गेल्या दीड महिन्यापासून सर्व्हिसिंग सेंटर बंद असल्याने वाहनांचे नियमित सर्व्हिसिंग रखडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध आहेत. तेव्हापासून दुचाकी व चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर आणि चार चाकी वाहनांचे अलायमेंट व बॅलन्सिंग सेंटर बंद आहेत. सध्या कडक निर्बंध असल्यामुळे ऑटोचाही व्यवसाय अडचणीत आला आहे. काही जणांनी आपली वाहने शासकीय कामात लावली आहेत. तर काहींची वाहने अद्यापही अत्यावश्यक सुविधांच्या नावाने रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. वाहने धावत असल्याने त्यांच्यामधील ऑईल नियमित बदलून वाहनांचे सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. यासोबतच चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलोमीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेन्सिंगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेन्सिंगवर आली आहेत. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहनांचे अॅव्हरेजही घटत आहे.
-------------------------------
बॉक्स
वाहने सुरू; पण गॅरेज बंद
‘घरात राहा, सुरक्षित राहा’ असे आवाहन करून शासनाने कडक निर्बंध लागू केले. पण, अत्यावश्यक सुविधा तसेच इतर महत्त्वाच्या कामांकरिता नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु सध्या ना पंक्चर दुरुस्तीची सोय आहे ना हवा भरण्याची. कमी हवेतही वाहने दामटविण्याशिवाय पर्याय नाही. चारचाकी वाहनांकरिता ही बाब मात्र फार अडचणीची ठरत आहे. शहरात काही ठिकाणी मात्र पंक्चर काढणे व हवा भरण्याची सोय सकाळी ९ ते ११ या वेळेत चोरीछुपे सुरू असल्याने काही चालकांची सोय होत आहे.
--------------------------------
जिल्ह्यात वाहने किती?
कार-जीप - १४७९५
दुचाकी - २०२१२७
ऑटो - ७८३४
ट्रक - २१५७
रुग्णवाहिका - ८२
-------------------------------------------
बॉक्स
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
वाहनांच्या सर्व्हिसिंगअभावी चालकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. नियमित सर्व्हिसिंग नसल्याने वाहनांचे अॅव्हरेज घटले, वाहने खिळखिळी झाली. पंक्चर दुरुस्तीची कोणतीही सोय नाही, अलायमेंटअभावी टायरवर परिणाम, ऑईल बदलले नसल्याने इंजिनला नुकसान तसेच वाहनांचे कोणतेही पार्ट मिळत नाहीत. त्यामुळे वाहनात काही बिघाड झाला तर घराच्या प्रांगणातच वाहन ठेवण्याची वेळ आली आहे.
---------------------------------
गॅरेजवाल्यांचे पोट-पाणी बंद
कोट
अलायमेंट आणि बॅलन्सिंगचे काम असून, पूर्वी दरदिवसाला १२ ते १५ वाहने यायची. दर पाच हजार किलोमीटर वाहन चालल्यानंतर अलायमेंट व बॅलन्सिंग करणे आवश्यक असते. अन्यथा वाहनाच्या टायरला हानी पोहोचते. कडक निर्बंधामुळे सर्वच बंद असल्याने अलायमेंट व बॅलन्सिंग करता येत नाही. आमची दुकाने बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अनिल घुनागे, व्यावसायिक वाशिम
------------------------------
कडक निर्बंध असल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद आहेत. यामध्ये सर्व्हिसिंग सेंटरचाही समावेश आहे. कडक निर्बंधापूर्वी साधारणत: दैनंदिन ५० ते ६० वाहने सर्व्हिसिंगसाठी येत असत. आता दुकान बंद असल्याने रोजगार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही अटींवर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असावी.
- शेख करीम, व्यावसायिक वाशिम
०००००
वाहनचालकांचे कोट
वेळेवर वाहनाचे अलायमेंट, बॅलन्सिंग आणि सर्व्हिसिंग केले तर वाहनांचे अॅव्हरेजही चांगले राहते. कडक निर्बंधामुळे सर्वच बंद असल्याने वाहनांचे सर्व्हिसिंग थांबले आहे. परिणामी, अॅव्हरेजही घटले आहे. वाहन बिघडले तर काय करावे, हा प्रश्न कायम आहे.
- राजेश भारती, वाहन मालक
-----------
कडक निर्बंध लागू असल्यामुळे अलायमेंट, बॅलन्सिंग आणि सर्व्हिसिंग सेंटर बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यापासून वाहनाचे सर्व्हिसिंग करता आले नाही. नियमित सर्व्हिसिंग असेल तर वाहन सुस्थितीत राहते तसेच अॅव्हरेजही चांगले मिळते.
- मुकुंद नायक, वाहन मालक
000000000000