लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत सर्व गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४१ पैकी ७५ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनीचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण व भूमापन करण्यासाठी स्वामित्व योजना अंमलात आणली. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वेक्षण व भूमापन प्रक्रिया प्रभावित झाली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सर्वेक्षण व भूमापन प्रक्रिया सुरू झाली आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. या नकाशातील मिळकतींना (जीआयएस डेटा) ग्रामपंचायतीमधील मिळकत रजिस्टर जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आणि मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील. त्यामुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६४१ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे.- शण्मुगराजन एस.,जिल्हाधिकारी, वाशिम