वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत सर्व गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४१ पैकी ७५ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
स्वामित्व योजनेंतर्गत राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनीचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण व भूमापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. या नकाशातील मिळकतींना (जीआयएस डेटा) ग्रामपंचायतीमधील मिळकत रजिस्टर जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आणि मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील. त्यामुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
००००००
मिळकत पत्रिका तयार होणार
गावठाण मोजणीमुळे मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावण्यास मदत होईल. ग्रामपंचायतीला गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सोय व सुलभता निर्माण होईल.
०००
ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ता कराच्या व्याप्तीत येतील. त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्र (नमुना-८) आपोआप तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, सुलभ व पारदर्शक होईल. गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत, शासनाच्या सार्वजनिक व प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होणार असल्याने गावठाणातील मिळकतीच्या हद्दी व क्षेत्राचे वाद कमी होतील.
०००
एकूण गावठाण ६४१
सर्वेक्षण पूर्ण ७५
सर्वेक्षण बाकी ५६६
००००
जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ६४१ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे.
शण्मुगराजन एस.,
जिल्हाधिकारी, वाशिम
०००००००००००