वाशिम : गत एका महिन्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील खरिपाची पिके पाण्याअभावी जागेवरच करपून जात आहे. परिणामी दुबार पेरणीचे ढग अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यात चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, चार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकर्यांनी तातडीने पेरण्या आटोपल्या. २९ जूननंतर रिमझिम पावसाचा अपवाद वगळता दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, माळरानावरील पिके सुकून गेली तर आता चांगल्या प्रतीच्या शेतातील पिकेही सुकत आहेत. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असल्याचे दिसून येते. सर्वात हलाखीची परिस्थिती मालेगाव तालुक्याची आहे. शिरपूर व झोडगा परिसराचा अपवाद वगळता मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे पीक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. गतवर्षीदेखील निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांनी झेलला आहे. निसर्गाने दगा दिल्याने जिल्ह्यातील बळीराजा पूरता हतबल झालेला आहे. अपेक्षीत उत्पादन हाती न आल्याने बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. दुष्काळाच्या छायेतून सावरत यावर्षी मृग नक्षत्रात शेतकर्यांनी एकदाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला. जवळपास एका महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके पूर्णत: सुकून गेली आहेत. दुबार पेरणीच्या संकटाने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. बँकांसह सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केलेल्या शेतकर्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याने आता पुढे काय? या प्रश्नाने शेतकर्यांची झोप उडाली आहे. सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती राहिली आहे.