लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित असून आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळाला मात्र दुष्काळी सवलतीच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रतिक्षा कायम आहे.२०१८ च्या खरीप हंगामात शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, या हंगामातील नुकसानाची पाहणी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक (एसडीआरएफ)आणि केंद्र आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून (एनडीआरएफ)करण्यात आली आहे. या पथकाचे निकष आणि अहवालानुसार ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पीक नुकसान झालेल्या शेतकºयांना दुष्काळी मदत दिली जात आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह मालेगाव आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एका महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मदत निधी दिला जात आहे. रिसोड तालुक्यात आतापर्यंत एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकºयांना ४४ कोटी रुपये इतकी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे आणि मानोरा तालुक्यातील उमरी खु. महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषीत आहे. दुष्काळी मदत निधी अजून संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही. तसेच यापूर्वी विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्कही परत मिळालेले नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी, विद्यार्थ्यांनी बुधवारी केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील ५३ हजार शेतकऱ्यांना ४४ कोटीची दुष्काळी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:06 PM