वाशिम: गत २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली. हलक्या दर्जाच्या जमिनीवरील खरिपाची पिके सुकत असल्याचे दिसून येते.
यावर्षी सुरूवातीपासूनच पावसात सातत्य नसल्याचा फटका शेतकºयांसह पिकांना बसत आहे. मृग नक्षत्रात चार-पाच दिवस हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस १२ ते १५ दिवसाच्या फरकाने परतला. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान, २०-२५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात बºयापैकी सार्वत्रिक पाऊस झाला होता. या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले होते. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून त्यापैकी यावर्षी ४ लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपातील विविध पिकांची पेरणी झाली. गत काही दिवसांपासून पावसाचा थेंबही नसल्याने पिके सुकत चालल्याचे दिसून येते. हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिक परिस्थिती भयावह आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता किनखेडा येथील पंजाबराव अवचार या शेतकºयांनी व्यक्त केली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.