मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मानोरा तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. आता पावसाळा परतीच्या मार्गावर असताना पुढे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उरली नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीपाची पेरणी पहिल्याच महिन्यात ६० टक्के उरकण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे उर्वरित शेतकºयांनीही पेरणी उरकली. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात आली असताना जुलैच्या मध्यंतरी बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे पिक परिस्थिती सुधारली; परंतु आता महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने फुल, शेंगावर आलेली पिके सुकत चालली आहेत. त्यातच मागील वर्षी तूर आणि सोयाबीनला अपेक्षीत भाव न मिळाल्याने तालुक्यातील काही शेतकºयांनी मुग आणि उडिद या पिकाचा पेरा वाढविला. कमी कालावधीची ही पिके मात्र आता पावसाअभावी सुकत आहेत. मुगाच्या शेंगा दाणे धरण्यापूर्वीच सुकत असून, उडिदाचा फुलोरा पावसाअभावी गळत आहे. सोयाबीनची स्थितीही गंभीर झाली आहे. त्यामुळे यंदा पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. येत्या दोन चार दिवसांत पाऊस न आल्यास पिके हातची जाणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पावसासाठी देवाला साकडे
तालुक्यात महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना तालुक्यातील कारखेडा येथे नामजप कार्यक्रमाचे आयोजन करून पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले आहे. कारखेडातील प्रसिद्ध शंकरगीर महाराज संस्थानवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून, यानिमित्त रविवार १३ आॅगस्ट रोजी नगरभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.