वाशिम : दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किती महसूल वसूल व्हायला हवा, याचे उद्दीष्ट प्रशासकीय यंत्रणांमधील प्रमुख विभागांना ठरवून दिले जाते. त्यानुसार, यंदाही नगर परिषदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खनिकर्म विभाग, महावितरण, तहसील कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यासह इतरही यंत्रणांनी मिळालेल्या उद्दीष्टाच्या पुर्ततेसाठी जीवाचा आटापिटा करणे सुरू केले आहे. मात्र, यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे. असे असताना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा विविध स्वरूपातील संकटांमुळे अपेक्षित उत्पादन न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. परिणामी, महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम प्रशासनाकडून अवलंबिण्यात आलेल्या करवसुली, महसूल वसुलीवर झाला असून १४ मार्चपर्यंत सर्वच यंत्रणांकडून वसुलीचे ५० टक्के उद्दीष्टही साध्य झालेले नाही, अशी माहिती त्या-त्या विभागाकडून प्राप्त झाली.७७४ गावांची अंतीम पैसेवारी ४७ पैसे!जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूरांसह इतर घटक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याने मार्चअखेरपर्यंत अपेक्षित महसूल वसुलीचे प्रमाण घटणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
दुष्काळसदृष स्थितीचा महसूल वसूलीवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:34 PM
वाशिम : यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे.महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे.