लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’ने मंगळवार, ३० मे रोजी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रा. ल. पाटील यांनी केले आहे.औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांनी आपल्या आधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही संबंधिताना देण्यात आल्या आहेत. तथापि, औषध विक्रेत्यांनी जनहित लक्षात घेता ३० मे च्या बंदमध्ये सहभागी न होता, सर्व आपली दुकाने सुरु ठेवावीत. जेणेकरून गरीब रुग्णांची व जनतेची गैरसोय होणार नाही, अशी विनंती संघटनेकडे करण्यात आल्याचे सहायक आयुक्तांनी कळविले आहे. संप काळात जिल्ह्यात या ठिकाणी मिळतील औषधेरुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने अत्यावश्यक स्थितीदरम्यान औषध उपलब्ध करून देण्यासाठी काही मेडिकल्सला परवानगी दर्शविली आहे. त्यात वाशिममधील पुसद नाकास्थित गायत्री मेडिकल्स, लाखाळा येथील रुद्र एजन्सीज, बसस्थानकामागील आधार मेडिकोज, राजनी विहीर येथील गणेश मेडिकल, रिसोडमधील गणेश मेडिकल्स, मालेगावमधील अकोला मेडिकल स्टोअर्स, बाजार लाइन येथील साईनाथ मेडिकल, मंगरूळपीरमधील गणेश मेडिकल, पोस्ट आॅफिसजवळील बाहेती मेडिकल, मानोरामधील सोहम मेडिकल, मंगलमूर्ती मेडिकल, कारंजामधील शिवम मेडिकल, गांधी चौक येथील मिलिंद मेडिकल येथे तातडीच्या काळात औषध मिळणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
औषध विक्रेत्यांनी संपात सहभागी होऊ नये!
By admin | Published: May 30, 2017 1:44 AM