वाशिम : वर्षागणिक घटत चाललेले पर्जन्यमान आणि त्यामुळे उद्भवणारी पाणीटंचाई, प्रतिकुल हवामान आदी कारणांमुळे जिल्ह्यात फळबागांच्या क्षेत्रात वाढ होणे अशक्य ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फळबाग लागवडीच्या माध्यमातून कमी पाणी व कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात किमान पाच हजार हेक्टरवर फळबागा उभ्या करण्याचे नियोजन कृषी विभागाकडून साधारणत: चार महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. विविध स्वरूपातील फळबागांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून भरीव अनुदानाची तरतूद शासनस्तरावरून करण्यात आली आहे. त्यानुसार, सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यादृष्टीने नियोजन व कार्यवाही केली जात आहे. मात्र, त्यास शेतकºयांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प यंदा कोरडे पडले आहेत. नदी-नाल्यांनाही पाणी नाही. याशिवाय विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळीही प्रचंड प्रमाणात खालावल्याने शेतकरी हैराण आहेत. अशा स्थितीत त्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करणे अशक्य ठरत आहे. पाण्यासंदर्भातील परिस्थिती सुधारल्यास निश्चितपणे फळबाग लागवडीचे क्षेत्रही वाढणार आहे.- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम