शिरपूर जैन: राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे येत्या ११ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या खंडाळा विज उपकेंद्राच्या कामाला वेग आला आहे. उर्जामंत्र्यांच्या हस्तेच या ३३ केव्ही विजउपकें द्राचे लोकापर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन, खंडाळा, वाघी बु., वाघी खु. कोठा, ढोरखेडा, बोराळा, करंजी, वसारी, तिवळी, दुधाळा, घाटा, मिर्झापूर, पांगरखेडा, दापुरी, दापुरी-कालवे, शेलगाव खवणे, या गावांच्या शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पुरेसा विज पुरवठा होत नसे. सततचे भारनियमन आणि कमी अधिक दाबामुळे विज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचन करणेच कठीण झाले होते. या पृष्ठभूमीवर खंडाळा येथे ३३ केव्हीचे विज उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता भासू लागली आणि २०१२ मध्ये शिरपूर ग्रामपंचायतने आसेगाव मार्गावरील ई-क्लास जमिनही उपलब्ध करून दिली. त्यानंतर २०१३ च्या अखेरीस उपकेंद्राचे कामही सुरू झाले; परंतु हे काम संथगतीने होत असल्याने तीन वर्षांच्या काळातही पूर्ण झाले नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आॅक्टोबर २०१६ ला नागपूर येथील विज वितरणचे उच्च अधिकारी रेश्मे, वाशिम येथील कार्यकारी अभियंता मेश्राम, मालेगाव येथील उपविभागीय अभियंता राजेंद्र चव्हाण, यांनी उपकेंद्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी डिसेंबर २०१६ ला विज उपकेंद्र कार्यान्वित करण्याचा विश्वास दिला; परंतु अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. सद्यस्थितीत ११ केव्ही लाईन ओढणे, ८ फिडर जोडणे व इतर लहानसहान कामे बाकी आहेत. अशातच ११ मे रोजी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्तेच या विज उपकेंद्राचे लोकार्पण होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या विज उपकेंद्राच्या कामाला वेग दिला आहे.
उर्जामंत्र्यांच्या दौरा घोषणेमुळे विज उपकेंद्राच्या कामाला वेग
By admin | Published: May 02, 2017 7:13 PM