आसेगाव पो.स्टे. (वाशिम) - वातावरणातील बदलामुळे आसेगाव परिसरात साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. एरव्ही १०० ते १२५ या दरम्यान असलेली रुग्ण तपासणी आता २५० पेक्षाही जास्त होत असल्याचे आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदणीवरून स्पष्ट होते.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वातावरणात अचानक बदल होत असल्याने आसेगाव परिसरात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला, प्लेटलेट कमी होणे आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ताप व खोकल्याचे रुग्ण अधिक असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. एरव्ही आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० ते १२५ च्या आसपास रुग्णांची तपासणी केली जाते. अलिकडच्या काळात हा आकडा २५० पेक्षाही अधिक झाला आहे. ५ फेब्रुवारीपासून तर २७० च्या आसपास रुग्ण तपासणी होत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल जाधव, डॉ. हितेश सुर्वे यांनी दिला. रूग्णांना सर्दी, खोकला किंवा ताप आदी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन आजारावर नियंत्रण मिळवावे, असे आवाहन डॉ. जाधव व डॉ. सुर्वे यांनी केले.