लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ या अभिनव मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उघड्यावर शौचास जाणार्यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार, २४ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा, अरक, मानोली आणि सायखेडा या गावातील २१ लोकांना पकडून त्यांच्याकडून १९ हजार रुपये रोख स्वरुपात ‘ऑन दि स्पॉट’ दंड वसूल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे यांच्या नेतृत्वात तद्वतच पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत जि. प. आणि पं. स. च्या गुड मॉनिर्ंग पथकाने २४ सप्टेंबरला पहाटे ४.३0 वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील कासोळा येथील हगणदरी गाठली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्या ९ व्यक्तींना पकडण्यात आले. त्यापैकी आठ लोकांनी प्रत्येकी १२00 रुपये दंड ‘ऑन दि स्पॉट’ भरला. मात्र, मनोहर आकाराम खाडे नामक व्यक्तीने दंड न भरल्यामुळे त्यांची मंगरुळपीर पोलीस स्टेशनला नोंद घेऊन दोन दिवसांची मुदत देऊन सोडून देण्यात आले. अरक येथील पाच लोकांना पकडल्यानंतर चार लोकांनी प्रत्येकी १२00 रुपये दंड भरला; तर या गावातील शीलाबाई रमेश निकम या महिलेने दंड भरण्यास नकार दिला. शीलाबाई व रमेश या दोघांनी पथकासोबत हुज्जत घालून पोलिसांना बोलावल्यावर घरातून पळ काढला. त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश ग्रामपंचायतला देण्यात आले आहेत. यानंतर मानोली येथील दोन लोकांना पथकातील अधिकार्यांनी पकडले होते. दोघांनीही दंड भरुन आपली सुटका करुन घेतली.
सांसद आदर्श गावात पाच व्यक्तींवर कारवाई!हगणदरीमुक्त आणि सांसद आदर्श गावाच्या यादीत समाविष्ट असणार्या सायखेडा या गावातील हगणदरी मात्र आजही सुरुच असल्याची धक्कादायक बाब पथकाच्या निदर्शनास आली. याठिकाणी पाच व्यक्तींना २४ सप्टेंबरला उघड्यावर जाताना पकडण्यात आले. त्यापैकी सखाराम जाधव, सुनील जाधव आणि नागोराव गहुले यांनी ‘ऑन दि स्पॉट’ दंड भरल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.