लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने ( बीजेएस ) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आली असून, या अभियानात डिझेलच्या दराची अडचण समोर करून प्रशासन हात झटकत असल्याने जलसंधारणाच्या कामांसाठी बीजेएसकडून उपलब्ध करण्यात आलेल्या २३ जेसीबी आणि ९ पोकलन मशीन महिनाभरापासून उभ्या आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासन आणि बीजेएस दरम्यान सामंजस्य करार झाला आहे. या नुसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत असून, यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे.. या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी बीजेएसच्या वतीने जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, तर राज्य शासन डिझेल खर्च देत आहे. जलसंधारण विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत, यासाठी बीजेएसने वाशिम जिल्ह्यात ३० जेसीबी आणि १३ पोकलन उपलब्ध करण्यात आल्या आहेत . या मशीनच्या आधारे साठवण तळे, नाला- खोलीकरण, खोल समतल चर आदि कामे महिनाभरापासून करण्यात येत आहेत. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे ही कामे बंद पडली आहेत. त्यामुळे या कामांसाठी असलेल्या मशीनच्या आधारे ढाळीच्या बांधाची कामे केली जाऊ शकतात आणि तसे शासनाचे निर्देशही आहेत; परंतु या कामांसाठी डिझेलचा खर्च अधिक येत असून, शासनाच्या दरापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे कारणसमोर करून कृषी विभागासह इतर विभाग ही कामे करण्यास उदासीन असल्याने बीजेएसच्या २३ जेसीबी मशीन आणि २ पोकलन मशीन महिनाभरापासून उभ्या आहेत. यात कारंजा तालुक्यात ५ जेसीबी आणि २ पोकलन, वाशिम तालुक्यात १० जेसीबी, मंगरूळपीर तालुक्यात ४ जेसीबी आणि मालेगाव तालुक्यातील ४ जेसीबी मशीनचा समावेश आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता अडचणीत आली आहे.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुजलाम, सुफलाम अभियान वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:15 PM