वाशिम - रिठद ते खंडाळा शिंदे या दरम्यानच्या रस्त्यालगतचे नाली खोदकाम करताना रस्त्याची ऐसीतैसी झाली असून, सिमेंट पाईपही फुटले, अशी तक्रार पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
रिठद ते खंडाळा शिंदे तसेच रिठद ते महादेव मंदिराकडे जाणाºया रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी खडिकरण व डांबरीकरण झाले होते. रस्त्यालगत सिमेंटची पाईपलाईनदेखील टाकली आहे. या रस्त्यालगत दूरसंचारच्या एका खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी नालीचे खोदकाम सुरू केले. जेसीबी मशिनद्वारे खोदकाम करताना रस्ता खराब होणार नाही तसेच पाईप फुटणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र, नाली खोदकाम करताना कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याने रस्त्याची ऐसीतैसी होत आहे तसेच काही ठिकाणी पाईपही फुटले आहेत, असे आरू यांनी तक्रारीत नमूद केले. रस्त्यालगतच्या आंब्याच्या काही झाडांच्या मुळ्यादेखील तोडण्यात आल्या आहेत. यामुळे सदर झाडे वाळून जाण्याची भीतीही आरू यांनी निवेदनातून वर्तविली. खडिकरण व डांबरिकरण उखडले असल्याने रस्ता खराब होत आहे. या पृष्ठभूमीवर रस्ता व पाईपची दुरूस्ती करावी तसेच संबंधितांविरूद्ध योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शारदा आरू व शेतकरी गजानन ज्ञानबा बोरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले, अशी माहिती आरू यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात आरू यांनी खासदार भावना गवळी यांच्याशी चर्चा करीत निवेदन दिले.