नाना देवळे/ मंगरूळपीर (वाशिम):यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे मंगरुळपीर कृषी बाजार समितीमधून घेण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या अवषर्णामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.विविध आपत्तींचा सामना करणार्या शेतकर्याला यंदा निसर्गाने चांगलेच त्रस्त केले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला. शेतीची सर्व कामे करून जमीन पेरणीसाठी तयार केल्यानंतरही पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. उशिराने आलेल्या थोड्याफार पावसाच्या आधारे अनेक शेतकर्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आणि यात बराच वेळ निघून गेल्याने मूग, उडीदाच्या पिकांची वेळही राहिली नाही. पर्यायाने शेतकर्यांनी बहुतेक करून कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली. निकृष्ट बियाण्यांमुळे कित्येकांच्या शेतातील सोयाबीन उगवलेच नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या आधारामुळे सोयाबीन चांगलेच बहरले आणि शेतकर्याच्या चेहर्यावरही हिरवळ निर्माण झाली; परंतु ती फार काळ टिकलीच नाही आणि पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील सुकत चाललेल्या ऐन शेंगा धरलेल्या सोयाबीनप्रमाणे शेतकर्यांचा चेहराही सुकत चालला होता. याच दरम्यान पिवळा मोझ्ॉक, चक्रीभुंगा आदी रोगांनीही सोयाबीनवर आक्रमण केल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली. कित्येक शेतकर्यांच्या शेतात, तर एकरी ५0 किलोएवढेच उत्पन्न झाले. पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनचे उपन्न घटल्याने अनेकांनी या पिकाच्या काढणीसाठी मजूरही लावले नाही. या कित्येक शेतकर्यांनी पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. गतवर्षी १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१३ पर्यंत मंगरुळपीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण ७ लाख ४0 हजार ६0३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, तर यावर्षीच्या हंगामात मात्र १ एप्रिल २0१४ ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत केवळ २८९ हजार ४६३ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले!
By admin | Published: January 07, 2015 1:03 AM