लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (वाशिम): वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक दुधाळ जनावरे असलेल्या शिरपूर परिसरात चारा आणि पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. याचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर होत असल्याने दूध उत्पादनात घट आली असून, सरासरी चार हजार लिटर दूध संकलन होणाºया तीन केंद्रांवर आता केवळ ७०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. उन्हाचा पारा अद्यापही ४४ अशांच्या जवळपास आहे. या उन्हाचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर होत असतानाच चारा आणि पाणीटंचाईची समस्याही उग्र झाली आहे. त्यातच ढेपेचे दर प्रति किलो ३३ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे दुध उत्पादन घटत आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या असलेल्या शिरपूर परिसरातील ३२ गावांत दुध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिरपूर वगळता आसपासच्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने हा प्रकार होत आहे. शिरपूर जैन व परिसरात आॅगस्ट ते फेब्रुवारी दरम्यान दरदिवशी ४ हजार लिटर दूध उत्पादन होते. आता मात्र परिस्थिती फार बदलली आहे. आज घडीला दररोज केवळ ७०० लिटर पर्यंतच दूध संकलन होत आहे. त्यामुळे गावातील लोकांची दुधाची गरज भागणे कठीण झाले आहे. त्यातच मुसिलम बांधवांचा पवित्र सण मानला जाणारा रमजान ईद तोंडावर आला असून, या सणानिमित्त मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा तयार करण्यासाठी दुधाची मोठी गरज असते. सहाजिकच रमजान ईद निमित्त दुधाची मागणी वाढणार आहे; परंतु चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असल्याने रमजान ईदच्या सणासाठी दुधाच्या मागणीची पूर्तता करणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रमजान ईद पाकिटाच्या दुधावर साजरी करावी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
चारा, पाणीटंचाईमुळे दुध उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:34 PM