वाशिम : जिल्ह्यात कधीकाळी संत्रा, मोसंबी, पपई, आंबा, द्राक्ष, चिकू, कागदी निंबू आदी फळ पिकांसह गुलाब, झेंडू, लिली, मोगरा, शेवंती यासारख्या फुलांचेही उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढायला लागली होती. सद्या मात्र फळबागांसोबतच फुलशेतीलाही उतरती कळा प्राप्त झाली असून योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांमध्येही याप्रती उदासिनता दिसून येत आहे.जिल्ह्यात सद्या केवळ १५५ हेक्टर क्षेत्रावर सुट्या फुलांचे (झेंडू) उत्पादन घेतले जाते. गुलाबाची शेती नाममात्र २ ते ३ हेक्टरवर असून इतर कुठल्याच फुलाचे उत्पादन जिल्ह्यात होत नाही. विविध प्रकारच्या फुलांसाठी स्थानिक स्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध असताना विपरित हवामान, ग्रीन हाऊस तंत्रज्ञानासंबंधी मार्गदर्शनाचा अभाव आणि कृषी विभागाच्या उदासिन धोरणांमुळेच शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.फळबाग लागवडीसंदर्भातही जिल्ह्यात हेच चित्र असून जिल्ह्यातील एकंदरित पेरणीलायक ४.७५ लाख हेक्टर क्षेत्रापैकी उण्यापूऱ्या ५ हजार हेक्टरवर फळबागा उभ्या आहेत. त्यात विशेषत: मालेगाव, मंगरूळपीर या दोन तालुक्यांमध्ये संत्र्याचे अधिक उत्पन्न घेतले जाते. काहीठिकाणी पपई आणि आंब्याचे उत्पादन घेतले जात असून ही ठराविक फळे वगळता इतर कुठल्याच फळांचे जिल्ह्यात उत्पन्न घेतले जात नाही. कृषी विभागाकडून अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी पुरेशी माहिती न मिळणे, प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळेच शेतकरी केवळ पारंपरिक पिकांवर विसंबले असून फळबाग, फुलशेतीकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेतजमिन कोरडवाहू असून डाळींब, द्राक्ष, अंजीर आदी फळपिके प्रतिकुल हवामानामुळे तग धरत नाहीत. याशिवाय दरवर्षी पाण्याची देखील कमतरता भासते. त्यामुळेच फळबाग, फुलशेतीचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्याकरिता कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत.- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
फळ, फुलशेतीचे प्रमाण घटले!
By admin | Published: May 03, 2017 1:45 AM