वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या विहिरींची कामे पूर्ण होण्यासाठी रोहयो विभागाने ५ जानेवारीला मार्गदर्र्शक सूचना जारी केल्या असून एका ग्राम पंचायतीला एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असल्यास, त्या ग्रामपंचायतींमध्ये नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नये, असे जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यामुळे अपूर्ण विहिरींवरून नवीन विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी शासनातर्फे विहिर बांधकामाला प्राधान्य दिले जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा लाभ दिला जातो. विहिर बांधकामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात नसल्याने विहिरींची कामे प्रलंबित राहत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती विचारात घेता अपूर्ण असलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या रोहयो विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रगतीपथावर असलेल्या विहिरींची कामे लक्षात घेऊनच नवीन विहिरींना मंजूरी मिळणार आहे. एका ग्राम पंचायतीत एका वेळेस पाच विहिरींची कामे प्रगतीपथावर राहतील, याची दक्षता ग्रामपंचायती तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना घ्यावी लागणार आहे. एका ग्रामपंचायतीत तीन विहिरींचे कामे प्रगतीपथावर असल्यास नव्याने दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येतील; परंतू पाच पेक्षा जास्त विहिरी अपूर्ण असतील तर संबंधित ग्रामपंचायतीत नवीन विहिरींना प्रशासकीय मान्यता देऊ नये, निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतनिहाय अपूर्ण असलेल्या विहिरी आणि रोहयोंतर्गत ग्रामपंचायतनिहाय नव्याने मंजूर असलेल्या विहिरींचा आढावा घ्यावा लागणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पाच पेक्षा अधिक विहिरींची कामे अपूर्ण असतील आणि नव्याने तेथे विहिर मंजूर असेल तर त्या विहिरींची प्रशासकीय मान्यता वांध्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या अपूर्ण विहिरी आणि नव्याने मंजूरी द्यावयाच्या विहिरींची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात केली जाईल.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम