मानोरा : पंचायत समिती अंतर्गंत येत असणाऱ्या फुलउमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उघडयावर भरते. वर्गखोल्या नसल्याने काही वर्ग उघडयावर बसतात. याबाबत अनेकदा वरिष्ठांना कळविले तरी वर्गखोल्या बांधून मिळाल्या नाहीत.फुलउमरी येथील जिल्हा परिषद शाळेत २४३ पटसंख्या असून या शाळेला एकूण तीनच वर्गखोल्या आहेत. एकूण ८ शिक्षक कार्यरत आहेत.अनेक शाळांना नविन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मिळाला आहे. पाणी टंचाईचे कारण पुढे करुन सद्या जिल्हाधिकारी यांनी ही सर्व बांधकामे थांबविली आहे, मात्र फुलउमरी येथील जिल्हा परिषद शाळेला अपुऱ्या वर्गखोल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे. मुख्यध्यापक , शिक्षक मात्र याबाबत काही करु शकत नाही. संबधितांनी याकडे लक्ष दयावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.
शाळा समितीच्या मागणीनुसार पाठपुरावा केला - अनिल पवार
फुलउमरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला दोन नविन वर्गखोल्या मिळाव्या यासाठी तेथील शाळा व्यवस्थापन समिती व मु.अ. मार्फत प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा केला आहे. हा प्रस्ताव सद्या वाशिम जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित आहे. विद्यमान आमदार, पालकमंत्री यांनी सुध्दा याची दखल घेतली होती, मात्र अद्याप प्रशासकीय स्तरावरुन आदेश नाहीत. विद्यार्थ्यांची अडचण आहे अशी प्रतिक्रीया शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांनी व्यक्त केली.