महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित कंपनीच्या सौर कृषी पंपाची निवड करून २४ हजार ७१० रुपयांची रक्कम भरली. त्यानुसार संबंधित कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या शेतात कृषी पंपाचे साहित्य पोहोचवून दिले. मात्र, सात महिने उलटले तरी या कृषी पंपाची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे सौर कृषी पंपाचे साहित्य त्यांच्या शेतात धूळखात पडले आहे. त्यातच सौर कृषी पंपाची जोडणी रखडल्याने सिंचनाअभावी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ते याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत असतानाही त्यांची समस्या सोडविण्याची तसदी आजवर घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच शेतात धूळखात पडलेले सौरपंपाचे साहित्य चोरीस जाण्याची भीतीही त्यांनी वर्तविली असून, या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व सौरऊर्जा कंपनीवर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जोडणीअभावी सौर पंपाचे साहित्य सात महिन्यांपासून धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:56 AM