जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. सध्या कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३३ हजार ४४१ वर पोहोचला असून, ३४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे; तर ४३१७ जणांवर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाची ही साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत रुग्रालये व मेडिकल्स वगळता अन्य सर्व दुकाने, आस्थापना, फळविक्री सक्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्बंधामुळे फळविक्री करणाऱ्यांवर संक्रांत ओढवली असून, ९ मेपूर्वी ज्या व्यावसायिकांनी चिकू, अंगूर, पपई यासह आंब्याचा स्टाॅक करून ठेवला, त्यांच्याकडील फळे जागीच सडत आहेत. यामुळे फळविक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने घरपोच फळे पोहोचविण्यास परवानगी दिली; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांकडून मागणीच नसल्याने हा पर्याय फायदेशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
.............................
बाॅक्स :
महागडा हापूस आंबा पडतोय काळा
जिल्ह्यातील अनेक फळविक्रेत्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांकडून मागणी होत असल्याने कोकणातील हापूस आंब्याच्या पेट्या उपलब्ध केल्या होत्या; मात्र ९ मे पासून विक्रीच बंद असल्याने पेट्यांमधील आंबाही काळा पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
.................
कोट :
फळांची विक्री वेळेत झाली, तरच त्यातून पैसे मिळतात; अन्यथा फळे जागीच सडून मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. ९ मे पासून विक्री पूर्णत: बंद असल्याने इतर फळांसोबतच विशेषत: आंबे जागीच खराब झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात महागडा हापूस आंबा डोळ्यादेखत सडताना पाहणे अशक्य झाले आहे.
- शे. अजीज शे. गफ्फूर
फळविक्रेता, वाशिम