लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0 आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ९६ टक्के नागरिकांना आधार कार्ड तयार करून देण्यात आले आहेत. मात्र, आधार कार्ड नोंदणी मोहिमेदरम्यान राबविण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान नावात चुका झाल्या असून, अनेकांची जन्मतारीख, रहिवासी पत्ते चुकीचे नोंदविल्या गेले. यासह विविध स्वरूपातील गंभीर चुका झाल्या असून, त्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, सुमारे ५0 ट क्के नागरिकांच्या आधार कार्डांमध्ये विविध स्वरूपातील त्रुटी राहिल्याने कार्ड जवळ असतानाही ते निरूपयोगी ठरत असल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. त्यामुळे शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे प्रमाण ९६ टक्के दिसत असले, तरी बिनचूक नोंदणी केवळ ४६ टक्क्यांच्याच आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधार कार्डांपासून अद्याप वंचित असलेले नागरिक, शालेय विद्यार्थी, नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करून देण्यासोबतच त्रुटींची पूर्तता करणे, आधार कार्डशी मोबाइल क्रमांक संलग्नित करून अद्ययावत करणे, ही कामे सध्या प्रथम प्राधान्याने केली जात आहेत. त्यानुसार, १६ सप्टेंबर २0१७ च्या अध्यादेशानुसार रस्त्यांवरील आधार नोंदणी केंद्र बंद करून, केवळ प्रशासकीय कार्यालयांमध्येच कायमस्वरूपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, मुळातच आधार नोंदणी संच कमी असणे आणि त्यातच ते वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. तथापि, आधार नोंदणी मोहिमेत उद्भवलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्ह्याला किमान १00 अतिरिक्त आधार नोंदणी संच मिळणे गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.
धडधाकट असताना अनेकांची दिव्यांग म्हणून नोंद!आधार नोंदणी संचामधील हाताच्या बोटांचे ठसे घेणारे अधिकांश ‘स्कॅनर’ नादुरूस्त आहेत. त्यामुळे ‘स्कॅनर’वर हात ठेवूनही बोटांचे ठसे नोंदणी अर्जांवर उमटत नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. याच कारणामुळे बहुतांश नागरिकांची नोंद चक्क दिव्यांग म्हणून झाली. असे असताना ही गंभीर त्रुटी अद्याप दूर झालेली नाही. आजही जिल्ह्यातील आधार नोंदणी संचांमधील ‘स्कॅनर’मध्ये हा ‘फॉल्ट’ कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आधार नोंदणी संचांचा मेळ लागेना!आधार नोंदणीचे साहित्य विहित मुदतीत परत न केल्यामुळे सन २0१४-१५ मध्ये वाशिममधील एका संस्थेवर पोलीस कारवाई करण्यात आली होती. सदर संस्थेकडे २६ आधार नोंदणी संच होते, ते दरम्यानच्या काळात वाशिम शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, त्यातील २३ संच जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत; तर २ संच चोरीला गेल्याची नोंद असून, १ संच आजही संबंधित संस्थेकडे असून तो परत घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहि ती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.